Latur News: राजकारणाच्या रणांगणात झुंजार लढा देऊन जनतेचा विश्वास संपादन केला, पण नियतीच्या क्रूर खेळासमोर मात्र त्यांचा पराभव झाला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शाहूताई कांबळे यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संताप आणि शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
आज पहाटे शाहूताई कांबळे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने अहमदपूरमधील खाजगी रुग्णालयात नेले, मात्र पहाटेची वेळ असल्याने रुग्णालयाचे दरवाजे उघडले नाहीत. तब्बल एक तास उपचारांसाठी वणवण केल्यानंतर त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
अहमदपूरची आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर?
शाहूताईंच्या मृत्यूने शहरातील आरोग्य व्यवस्थेचा बुरखा टराटरा फाडला आहे. १५-२० मिनिटे आधी उपचार मिळाले असते, तर कदाचित शाहूताई वाचल्या असत्या, अशी हळहळ व्यक्त होत आहे. “एका लोकप्रतिनिधीला जर वेळेवर उपचार मिळत नसतील, तर सामान्यांचे काय?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
निकालाचा आनंद नियतीने हिरावला
शाहूताई कांबळे या राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्या होत्या. २०१७ मध्ये अवघ्या १२ मतांनी झालेला पराभव विसरून त्यांनी यंदा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार विजय मिळवला होता. त्यांच्या निधनानंतर शासकीय रुग्णालयात महिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.


