Indapur Election: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 जागांसाठी 114 आणि पंचायत समितीच्या 16 जागांसाठी तब्बल 213 उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा थेट आणि अटीतटीचा सामना रंगणार आहे.
बड्या नेत्यांच्या वारसांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरवले आहे.
- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे: यांनी आपले चिरंजीव श्रीराज भरणे यांना बोरी पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली आहे.
- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील: यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या बावडा-लुमेवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत.
- आप्पासाहेब जगदाळे: पुणे जिल्हा बँकेचे संचालक असलेल्या जगदाळेंनी आपले चिरंजीव यशराज जगदाळे यांना माळवाडी-वडापुरी गटातून रिंगणात उतरवले आहे.
मैत्रीचा नवा अध्याय आणि राजकीय समीकरणे
नगरपरिषद निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणारे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांनी या निवडणुकीत ‘मैत्रीचा नवा अध्याय’ सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शरद पवार गटाने एकत्रितपणे ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने ही युती आकाराला आली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रवीण माने यांच्या साथीने राष्ट्रवादीला कडवे आव्हान दिले आहे.
बंडाचे निशाण आणि धोक्याची घंटा
नेत्यांच्या घराणेशाहीला कंटाळून अनेक निष्ठावंतांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. माळवाडी-वडापुरी गटात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शशिकांत तरंगे आणि बाळासाहेब हरणावळ (गुरुजी) यांनी अपक्ष अर्ज भरून मंत्री दत्तात्रय भरणे यांची डोकेदुखी वाढवली आहे. तसेच, सतीश पांढरे, विलासराव वाघमोडे आणि महेंद्र रेडके यांसारख्या नेत्यांनी भाजपची वाट धरत आपल्याच जुन्या नेत्यांना आव्हान दिले आहे.
भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि ‘वेट अँड वॉच’
भारतीय जनता पक्षाने ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना तिकिटे दिल्याने पक्षातील जुन्या आणि सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून पक्ष तालुक्यात रुजवला, त्यांना डावलून आयात उमेदवारांना झुकते माप दिल्याने पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
27 जानेवारीला चित्र स्पष्ट होणार
दरम्यान, मंगळवारी, दि. 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. अर्ज माघारीनंतरच लढतीचे अंतिम आणि स्पष्ट चित्र समोर येईल. सध्या तालुक्यात गावभेट दौरे, कोपरा सभा आणि लग्न-समारंभांच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडाला आहे.


