Pune Crime: पुण्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. माहेरून ५० तोळे सोने आणि ३५ लाख रुपये देऊनही सासरच्यांची पैशांची हाव काही संपली नाही. अखेर, सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून सोरतापवाडी येथील दीप्ती रोहन चौधरी या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात सरपंच सासूसह शिक्षक असलेल्या सासऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैसे देऊनही छळ थांबेना
मिळालेल्या माहितीनुसार, दीप्तीचे लग्न सात वर्षांपूर्वी सोरतापवाडी येथील रोहन चौधरी याच्याशी झाले होते. लग्नात माहेरच्यांनी ५० तोळे सोने आणि शाही थाटमाट केला होता. संसार सुरळीत चालावा यासाठी माहेरून वेळोवेळी १० लाख रुपये आणि गाडीसाठी २५ लाख रुपये देण्यात आले. मात्र, तरीही सासरच्यांकडून चारचाकी गाडीसाठी सतत पैशांची मागणी केली जात होती.
हेही वाचा – नाशिकमध्ये हुंडाबळीची घटना, सासरच्यांकडून पैशांची मागणी; 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
चारित्र्यावर संशय आणि मानसिक छळ
केवळ पैशांसाठीच नव्हे, तर पती रोहन हा दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे समोर आले आहे. अखेर या जाचाला कंटाळून शनिवारी रात्री दीप्तीने टोकाचे पाऊल उचलले. दीप्तीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून उरुळी कांचन पोलिसांनी पती रोहन, सरपंच सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


