Dharashiv : देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा होत असतानाच, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात ध्वजारोहण सुरू असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पीएसआय मोहन भीमा जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कर्तव्य बजावत असतानाच एका अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत मोठी शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
आज, २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी उमरगा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी गणवेशात, शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे होते. राष्ट्रगीत आणि ध्वजारोहणाची प्रक्रिया सुरू असतानाच पीएसआय मोहन जाधव यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. खाली पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली.
वैद्यकीय प्रयत्न ठरले अपयशी
जाधव कोसळल्यानंतर सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना उचलून उमरगा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.
पदोन्नतीनंतरचा सहा महिन्यांचा प्रवास संपला
विशेष म्हणजे, मोहन जाधव यांना अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच पीएसआय पदावर पदोन्नती मिळाली होती. यापूर्वी त्यांनी सोलापूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रदीर्घ सेवा बजावली होती. शांत संयमी स्वभाव आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. आजच्या या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ध्वजारोहण आणि मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये सर्व कर्मचारी ध्वजाला सलामी देत असताना अचानक जाधव खाली पडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


