Amit Shah On Piyush Goyal : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भवितव्य आणि नेतृत्व कोणाकडे जाणार, यावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. प्रफुल्ल पटेल यांना ‘राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणणे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना चांगलेच महागात पडले असून, या मुद्द्यावरून गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना कडक शब्दांत फटकारल्याची माहिती समोर आली आहे.
गोयलांच्या ‘त्या’ विधानामुळे संभ्रम वाढला
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबद्दल तर्कवितर्क लढवले जात असतानाच पियूष गोयल यांनी एका मुलाखतीत मोठे विधान केले होते. प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र, या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपचा हस्तक्षेप?
गोयल यांच्या या विधानानंतर भाजप राष्ट्रवादीच्या अंतर्गत निर्णयांत ढवळाढवळ करत असल्याचा आरोप होऊ लागला. पक्षाची अधिकृत प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच असे विधान केल्याने अमित शाह यांनी गोयलांकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. दिल्लीतील एका पत्रकाराने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे आपल्याकडून हे वक्तव्य झाल्याचे सांगत पियूष गोयल यांनी यापूर्वीच माफी मागितली आहे.
हेही वाचा – बीड आणि पुण्याचे पालकत्व आता ‘वहिनीं’कडे; राज्य सरकारकडून अधिकृत परिपत्रक जारी
प्रफुल्ल पटेलांची दिल्लीत धावपळ
या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. सुमारे सात मिनिटे चाललेल्या या चर्चेत नेमके काय घडले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
पटेलांचा विरोधकांना टोला
आमच्या पक्षाचा कोणताही संबंध नसलेले लोक जेव्हा आमच्याबद्दल भाष्य करतात, तेव्हा आश्चर्य वाटते. विधीमंडळ नेता कोण असावा आणि अध्यक्ष कोणाला करावे, हा संपूर्णतः आमच्या पक्षाचा प्रश्न आहे. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद गेल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे, असं पटेल यांनी म्हटलं आहे.
विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम
अजितदादांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील (विलिनीकरण), अशा चर्चांनाही प्रफुल्ल पटेल यांनी छेद दिला आहे. “विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही. योग्य वेळी लोकशाही प्रक्रियेने राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.


