मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, युवक तसेच समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्याच्या प्रगतीसाठी पारदर्शक, संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
“महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील. शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या ऐतिहासिक प्रसंगी मंत्रिमंडळातील सहकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांचा हा प्रवास केवळ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा नसून तो महाराष्ट्रातील महिला नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


