Rajpal Yadav Bail : १६ वर्षे जुन्या ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेल्या राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा मिळवण्यासाठी न्यायालयाने एक अत्यंत कडक अट घातली आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत १.५ कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (DD) न्यायालयात जमा केल्यास, राजपाल यादवचा जामीन मंजूर केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
भाचीच्या लग्नासाठी मागितला होता जामीन
राजपाल यादवच्या भाचीचे लग्न १९ फेब्रुवारी रोजी होणार असून, या कौटुंबिक सोहळ्यासाठी त्याने न्यायालयात जामिनाची मागणी केली होती. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर आज दुपारी ३ वाजेपर्यंत दीड कोटींची रक्कम जमा झाली, तरच त्याला तात्काळ जामीन मिळेल. ही अट पूर्ण न झाल्यास, या अर्जावर उद्या म्हणजेच १७ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी घेतली जाईल.
न्यायालयाने वकिलांना फटकारले
सुनावणीदरम्यान न्यायालयाने राजपाल यादवच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “पैसे परत करण्यासाठी तुम्हाला यापूर्वी २५ ते ३० वेळा संधी देण्यात आली होती, तरीही तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही,” अशा शब्दांत कोर्टाने राजपालला सुनावले. राजपालच्या वकिलांनी असा दावा केला की, एकूण रक्कमेपैकी ३ कोटींहून अधिक रुपये परत केले असून आता केवळ २.१० कोटी रुपये देणे बाकी आहे. मात्र, कर्ज घेतल्याची कबुली दिल्यानंतर शिक्षा रद्द करण्याची मागणी कशी करता येईल, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
नेमके प्रकरण काय आहे?
राजपाल यादवच्या या कायदेशीर संघर्षाची मुळे १६ वर्षे जुन्या एका आर्थिक व्यवहारात आहेत. २०१० मध्ये राजपालने ‘आता पता लपता’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ‘मुरली प्रोजेक्ट्स’कडून ५ कोटींचे कर्ज घेतले होते. हे पैसे परत करताना दिलेले चेक बाऊन्स झाले, ज्यामुळे राजपाल आणि त्याच्या पत्नीविरोधात फसवणुकीचा खटला दाखल झाला. यापूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी राजपालने तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले होते. याआधीही याच प्रकरणात त्याला तुरुंगवास भोगावा लागला आहे.


