यवत (पुणे): दौंड तालुक्यातील यवत रेल्वे स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर मंदिराजवळ शेतात जाणाऱ्या रस्त्यावर शशिकांत चव्हाण यांच्या घरावर तीन अज्ञात चड्डी- बनियन घातलेल्या व्यक्तींनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दगड, काठ्यांनी कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चव्हाण यांचा तरुण मुलगा अविनाश शशिकांत चव्हाण ( वय ३४) यांचा मृत्यू , तर तीनजण जखमी झाले आहेत. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करणे सुरु आहे. घटनास्थळी यवत पोलिसांचे पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील यवतमधील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये शशिकांत चव्हाण यांचे कुटुंब राहते. त्यांच्या घरावरती मध्यरात्री दरोडा पडला आहे. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात चव्हाण यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर चव्हाण दाम्पत्यासह घरातील आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान मध्यरात्री तीन जणांनी शशिकांत चव्हाण यांच्या घरामध्ये शिरकाव करत त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. हे तीन इसम बनियान आणि चड्डी घालून घरात घुसले होते. हे तीन इसम चोरीच्या उद्देशाने आले होते का? या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे. मात्र, हा हल्ला जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय चव्हाण कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत. जखमी झालेल्या तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पोलीस सर्व शक्यतांचा आधार घेऊन तपास करीत आहेत. हल्ला केलेल्या तिघांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. तसेच गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया यवत पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. तसेच जखमींवर लोणी काळभोर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


