Hadapsar Canal Wall Collapse: पुण्यातील हडपसर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. मगरपट्टा सिटीच्या मागील प्रवेशद्वाराजवळ, मगरपट्टा ते कोरेगाव पार्कला जोडणाऱ्या प्रमुख मार्गालगत असलेल्या कालव्याची भिंत अचानक तुटल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर कालव्यातील प्रचंड प्रमाणातील पाणी वेगाने बाहेर पडून रस्त्यांवर पसरले, आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसर जलमय झाला.
वाहतुकीवर मोठा परिणाम
या अनपेक्षित घटनेमुळे महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे बंद पडला असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. एवढेच नव्हे, तर मगरपट्टा सिटीच्या आतील भागातही पाणी घुसल्याने रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाण्याची नासाडी झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी
दरम्यान, शहरात आधीच पाणीटंचाईची समस्या असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाने तातडीने खडकवासला धरणातून कालव्यात सोडले जाणारे पाणी थांबवले. तरीही कालव्यात साठलेले पाणी बाहेर येत असल्याने काही भागांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून भिंतीच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.


