Pune News : पुणे शहरात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. हडपसरमधील मोहम्मदवाडी रोडवरील ‘रेस्क्यू फाउंडेशन’ संस्थेतून १३ बांगलादेशी मुलींनी केअरटेकर आणि सुरक्षारक्षकावर हल्ला करत पलायन केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलीने औषध घेण्याच्या बहाण्याने केअरटेकर लक्ष्मी कांबळे यांना दरवाजा उघडायला लावला. दरवाजा उघडताच इतर काही मुलींनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना वैद्यकीय कक्षात बंद करून ठेवले. त्याचवेळी साफसफाईदरम्यान मुख्य दरवाजा उघडा राहिल्याचा फायदा घेत सर्व १३ मुलींनी सुरक्षारक्षकावर झडप घालत त्याला ढकलत आणि चावा घेत तेथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हडपसर आणि सय्यदनगर परिसरात शोधमोहीम सुरू केली. यामध्ये दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित ११ मुली अद्याप फरार आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नसून केवळ जनरल डायरी (GD) नोंद करण्यात आली आहे.
‘रेस्क्यू फाउंडेशन’ ही संस्था मानवी तस्करीतून मुक्त केलेल्या महिला व मुलींसाठी कार्य करते. मात्र १६ मार्च २०२४ पासून या संस्थेचे पोलीस संरक्षण काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संस्थेने याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही संरक्षण मिळाले नसल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, संस्थेत क्षमतेपेक्षा जास्त महिलांचा निवास असल्याने आणि प्रत्यार्पण प्रक्रियेला १ ते २ वर्षांचा कालावधी लागत असल्याने काही मुलींमध्ये नैराश्य वाढत असल्याचेही सांगितले जात आहे.
सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार मुलींचा शोध सुरू असून या घटनेमुळे महिला संरक्षण गृहांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


