Pune Traffic Update: पुणे शहरातील रस्त्यांवर वर्षानुवर्षे धूळ खात आणि बेवारस अवस्थेत उभी असलेली वाहने आता कायमची गायब होणार आहेत. पुणे वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांविरुद्ध बुधवार, 15 एप्रिल 2026 पासून विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे. शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी ही वाहने जप्त करण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, यामुळे रस्ते मोकळे होण्यास मदत होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येवर आता पोलिसांनी थेट ‘ॲक्शन मोड’मध्ये येऊन काम सुरू केले आहे.
24 तासांचा ‘अल्टिमेटम’ अन् जप्तीची टांगती तलवार
वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या नवीन कडक नियमांनुसार, रस्त्याच्या कडेला सोडून दिलेल्या वाहनांवर पोलीस आता जागीच नोटीस चिकटवणार आहेत. नोटीस लावल्यानंतर केवळ 24 तासांची मुदत वाहन मालकाला दिली जाईल. या मुदतीत मालकाने स्वतःहून वाहन न हटवल्यास ते ‘बेवारस’ म्हणून घोषित केले जाईल. त्यानंतर पुढील 48 तासांच्या आत टोईंग व्हॅनद्वारे हे वाहन उचलून जप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या वेगवान कारवाईमुळे बेजबाबदार वाहन मालकांचे धाबे दणाणले आहेत.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी संयुक्त मोहीम आणि मोठा दंड
शहरातील प्रमुख रस्ते आणि अरुंद गल्ल्यांमध्ये पडलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी पुणे महापालिका आणि वाहतूक पोलीस आता संयुक्तपणे ही मोहीम राबवत आहेत. जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी शहरात स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली असून ती महापालिकेच्या ताब्यात दिली जाणार आहेत. जर मालकाला आपले जप्त केलेले वाहन परत हवे असेल, तर त्याला महापालिकेकडे मोठा आर्थिक दंड भरावा लागेल. दंड भरल्याशिवाय वाहन मालकास दिले जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
प्रशासनाने नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जर तुमच्या परिसरात किंवा रस्त्यावर एखादे वाहन दीर्घकाळ बेवारस अवस्थेत पडले असेल, तर त्याची माहिती तुम्ही ‘PTP’ (Pune Traffic App) च्या माध्यमातून पोलिसांना देऊ शकता. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचतील आणि नोटीस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. वाहतूक कोंडीमुक्त पुण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.


