कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे आता कोरटकर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंतरिम जामिन अर्जच फेटाळून लावल्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर सत्र न्यायालयाने सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांची जमीन फेटाळण्याची विनंती मान्य केली आहे. सोमवार 17 मार्च रोजी प्रशांत कोरटकर याच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने या जामीन अर्जावरील निकाल मंगळवार 18 मार्चपर्यंत राखून ठेवला होता. त्यानंतर आता न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान प्रशांत कोरटकरने काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात येत आहे. तसेच यावेळी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कोरटकरविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कोरटकरने अंतरिम जामिनासाठी कोल्हापूर सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने मात्र हा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता प्रशांत कोरटकर याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


