पिंपळवंडी (जुन्नर): येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी मित्रांसमवेत गेलेल्या अल्पवयीन मुलाचे त्याच्याच मित्राने प्राण वाचविले. ही घटना नेहरकरवाडी येथे नुकतीच घडली. येडगाव धरणामधून कुकडी डाव्या कालव्यात पाण्याचा विसर्ग सुरू असून, ठिकठिकाणी दुपारच्या वेळेत बहुसंख्य मुले आपल्या मित्रपरिवाराच्या समवेत पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारा जय भगीरथ नेहरकर (वय 14) हा आपल्या मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला होता, जय याने पाण्यात उडी मारली व तो खाली असलेल्या खडकाच्या कपारीत अडकला. त्याच्या नाकाला मार लागल्यामुळे नाकातून रक्त येत होते. रक्ताचे लाल बुडबुडे पाण्यावर आल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या त्याच्या मित्रांनी भीतीपोटी पळ काढला. त्यावेळी प्रेम सचिन बर्डे (वय 14) हा स्वतःच्या घराजवळ उभा असताना पोहत असणारी मुले का पळतात, हे त्याने पाहिले. पळून जाणाऱ्या मुलांना प्रेमने पळण्याचे कारण विचारले असता जय पाण्यात बुडाला असल्याचे सांगितले.
त्यावेळी प्रेम याने मागचा-पुढचा विचार न करता ज्या ठिकाणी पाण्याच्या वर रक्ताचे लाल बुडबुडे येत होते, याचा अंदाज घेऊन स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. खोल पाण्यात खडकाच्या कपारीत अडकलेल्या जय यास पाण्यामधून बाहेर काढले. परंतु, जय बेशुद्ध अवस्थेत होता. प्रेम याने जय याच्या नाका-तोंडात गेलेले पाणी बाहेर काढले. कृत्रिम श्वासोश्वास देऊन त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बऱ्याच वेळाने जय याने हातापायांची हालचाल केली. जय शुद्धीवर आल्यानंतर प्रेम याने जय याला उचलून घरी नेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जयच्या नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, प्रेम याने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जयचे वडील भगीरथ नेहरकर यांनी प्रेम याचे आभार मानले. मुख्याध्यापक अशोक काकडे तसेच सर्व शिक्षकांनी प्रेमचे कौतुक करत त्याचा सत्कार केला.


