Saptashrungi Devi Temple: साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगी गडावरील मंदिर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. मंदिराच्या गर्भगृहातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीपैकी तब्बल २२ किलो ६९७ ग्रॅम चांदी गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावत
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या कागदपत्रांमध्ये ४०६ किलो चांदीची नोंद असताना, प्रत्यक्ष मोजणीत केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी आढळून आली आहे. हा साडेबावीस किलोचा फरक म्हणजे मोठा अपहार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, व्यवस्थापक सुट्टीवर असताना रात्रीच्या वेळी ही चांदी काढण्यात आल्याचे चौकशीत समोर आले असून, या कृतीमुळे संशयाची सुई तत्कालीन विश्वस्तांकडे वळली आहे.
प्रशासनाकडून कडक कारवाईचे संकेत
या गंभीर प्रकरणाची दखल घेत विभागीय आयुक्तांनी चौकशीचे चक्र फिरवले आहे. सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी या प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष आणि विश्वस्तांविरुद्ध भादंवि कलम ४०९, ४२० अन्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना या प्रकरणाचा सखोल तपास करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
रात्रीच्या अंधारात चांदी काढण्याचा प्रताप?
१५ सप्टेंबर २०२१ रोजीच्या ठरावानुसार ही चांदी दिवसा काढणे अपेक्षित होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या वेळी मूल्यमापक नसताना ही चांदी हलवण्यात आल्याचा आरोप आहे. तत्कालीन व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी या विरोधात पत्र व्यवहार केल्याचा राग मनात धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची चर्चाही आता गडावर रंगली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या गैरप्रकारानंतर आता सप्तशृंगी गडावरील हा प्रकार समोर आल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


