Pune MHADA : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. म्हाडा अंतर्गत पुणे गृहनिर्माण मंडळाने मार्च 2026 मध्ये सुमारे 3,000 परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यामध्ये 1RK, 1BHK आणि 2BHK अशा विविध प्रकारच्या घरांचा समावेश आहे.
या योजनेत चिखली, ताथवडे, वाकड, लोहगाव, मुंढवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर आणि पुनावळे या भागांतील प्रकल्पांचा समावेश आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या किमती आणि सुविधांसह घरे उपलब्ध असल्याने अर्जदारांना आपल्या गरजेनुसार पर्याय निवडता येणार आहे.
याशिवाय, पुणे म्हाडाकडून शिल्लक राहिलेल्या 295 घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) योजना देखील लागू करण्यात आली आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रात 113 तर पिंपरी चिंचवड क्षेत्रात 182 सदनिका उपलब्ध आहेत.
या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी 4 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून सुरू होणार असून अधिकृत पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी शुल्क 708 (GST सहित) असून हे न परताव्याचे आहे. तसेच EWS आणि LIG गटासाठी 20,000 इतकी अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. एकूण सुरुवातीचा भरणा रुपय 20,708 इतका असेल.
पात्रता निकष
अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे
महाराष्ट्र राज्याचा किमान 15 वर्षांचा रहिवासी असणे आवश्यक
डोमिसाईल प्रमाणपत्र अनिवार्य
ही योजना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर आधारित असल्याने लवकर अर्ज करणाऱ्यांना घर मिळण्याची संधी जास्त आहे. घर खरेदीसाठी इच्छुकांसाठी ही मोठी संधी असून, परवडणाऱ्या दरात स्वतःचे घर मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.


