Pune PMPML Accident: पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या अप्पा बळवंत चौकात (ABC) मंगळवारी दुपारी एका भरधाव पीएमपी बसने दुकानाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ‘ब्रेक फेल’ झाल्यामुळे अपघात झाल्याचा दावा बस चालकाने केला होता, मात्र प्रशासनाच्या प्राथमिक तपासात हा दावा फोल ठरल्याने संबंधित चालकाला तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
भरधाव बस थेट दुकानात; ७ दिवसांत चौकशीचा आदेश
वडगाव ते पुणे स्टेशन या मार्गावर धावणारी ही बस अप्पा बळवंत चौकात आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याकडेच्या दुकानात शिरली. या घटनेची गंभीर दखल घेत पीएमपी प्रशासनाने चालक बाळू चव्हाण याला दोषी धरत निलंबनाची कारवाई केली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सह-व्यवस्थापकीय संचालिका ॲलिस पोरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. प्राथमिक तपासात बसचे ब्रेक व्यवस्थित असल्याचे आढळले असून, तांत्रिक स्पष्टतेसाठी RTO अहवालाची प्रतीक्षा आहे. समितीला पुढील 7 दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पीएमपीची आर्थिक स्थिती खालावली; ४८५ कोटींचा भार पालिकेवर
एककीकडे अपघातांच्या घटनांमुळे पीएमपी चर्चेत असतानाच, दुसरीकडे महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षातील 484.96 कोटी रुपयांची संचलन तूट भरून काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. महामंडळाची एकूण अंदाजित तूट 808.26 कोटी रुपयांवर पोहोचली असून, त्यापैकी 60% वाटा या नात्याने महापालिका दरमहा 39.50 कोटींचे 12 हप्ते देणार आहे. तसेच, इंधन पुरवठा खंडित होऊ नये म्हणून MNGL ची थकबाकी फेडण्यासाठी 10 कोटी रुपये आगाऊ दिले जाणार आहेत.
वाढत्या तुटीमुळे विकासकामांवर ताण
पीएमपीच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने शहराच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहे. इंधन दरातील सततची वाढ, जुन्या बसची देखभाल आणि वाढता संचलन खर्च ही या तुटीमागची प्रमुख कारणे आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था टिकवण्यासाठी महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपये मोजावे लागत असल्याने, याचा थेट परिणाम शहराच्या इतर विकासकामांच्या बजेटवर होत असल्याचे चित्र आहे.


