Nitesh Rane: गेल्या सहा वर्षांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या ‘चिखलफेक’ प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा ठपका ठेवत जिल्हा सत्र न्यायालयाने भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांना एक महिना कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असली, तरी गंभीर आरोपांतून दिलासा मिळाल्याने राणे समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गंभीर कलमांतून सुटका, एका कलमात अडकले
न्यायालयाने या प्रकरणातील ४० संशयित कार्यकर्त्यांसह नितेश राणे यांची सरकारी कामात अडथळा आणणे (कलम ३५३) आणि मारहाण करणे (कलम ३३२) यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतून निर्दोष मुक्तता केली. मात्र, उपअभियंत्याला शिवीगाळ करणे आणि शांततेचा भंग करणे (कलम ५०४) या आरोपात न्यायालयाने राणेंना दोषी ठरवले. याच गुन्ह्यासाठी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
पाच वर्षांपूर्वीचा ‘तो’ थरार
ही घटना जुलै २०१९ मधील आहे. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या नितेश राणे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला होता. कणकवलीतील एका पुलावर महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना बोलावून, त्यांच्यावर राणे आणि त्यांच्या समर्थकांनी चिखलफेक केली होती. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओने संपूर्ण देशभर खळबळ उडवून दिली होती.
हायकोर्टात धाव घेणार
न्यायालयाने शिक्षा सुनावताच नितेश राणे यांच्या वकिलांनी या निर्णयाला आव्हान देण्यासाठी शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केली. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी न्यायालयाने शिक्षेला तात्काळ स्थगिती दिली आहे. परिणामी, नितेश राणे यांना सध्या कोठडीत जावे लागणार नसून, ही लढाई आता उच्च न्यायालयात लढली जाईल.


