Pune Metro: आयटी हबला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी पुणेकरांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मे महिन्यात सुरू होणारी ही मेट्रो सेवा आता 15 जूनपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नवे नियोजन समोर आले आहे. वारंवार बदलणाऱ्या डेडलाईन्समुळे प्रवाशांमधून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.
नेमका विलंब का झाला?
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामात अनेक बाह्य आणि तांत्रिक अडचणींचा अडथळा निर्माण झाला. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक कामगार गावी गेल्याने कामाचा वेग मंदावला. पुणे विद्यापीठ चौकातील पाषाण रॅम्प परिसरात मोठी जलवाहिनी फुटल्याने गळती सुरू आहे, ज्यामुळे बांधकामात अडथळे येत आहेत.
नवे वेळापत्रक काय आहे?
- पीएमआरडीएने (PMRDA) दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो सेवा आता दोन टप्प्यांत सुरू होईल:
- पहिला टप्पा (15 जून): सुरुवातीला एकूण 23 पैकी 12 स्थानकांदरम्यान मेट्रो धावणार आहे.
- दुसरा टप्पा (ऑक्टोबर): उर्वरित 11 स्थानकांवरील काम पूर्ण करून संपूर्ण मार्गिका ऑक्टोबरमध्ये प्रवाशांसाठी खुली केली जाईल.
प्रशासकीय हालचालींना वेग
पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी नुकतीच प्रकल्पाची पाहणी केली असून, जलवाहिनीची दुरुस्ती आणि स्थानकांसाठी आवश्यक जागा तातडीने मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. टाटा-पुणे आयटी सिटी मेट्रो कंपनीकडून अंतिम प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाईल, असे आयुक्त अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले.
नेत्यांच्या घोषणा आणि प्रत्यक्ष स्थिती
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2026 ची डेडलाईन दिली होती. त्याआधीही सप्टेंबर 2025 पासून अनेकवेळा मुहूर्त जाहीर झाले, मात्र प्रत्येक वेळी काम अपूर्ण राहिल्याने प्रकल्प लांबणीवर पडला. हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, मात्र आता 15 जूनची नवी तारीख तरी पाळली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


