Devendra Fadnavis: पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद मुंबईत ओसंडून वाहत आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत विजयोत्सव साजरा केला. या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत, बंगालमधील हा विजय राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रगतीचा नवा अध्याय असल्याचे प्रतिपादन केले.
‘भाजपच मूळचा बंगाली पक्ष’ – मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनी भाजपला ‘बाहेरचे’ संबोधल्याचा फडणवीस यांनी सडेतोड समाचार घेतला. “ममता दीदींना विसर पडलाय की, ज्यांनी भाजपची निर्मिती केली ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे मूळचे बंगालचेच सुपुत्र होते. त्यामुळे खरा बंगाली पक्ष भाजपच आहे. आज बंगालच्या जनतेने मोदींच्या नेतृत्वावर मोहोर उमटवत भाजपला दोन-तृतीयांश (2/3) बहुमताने निवडून दिले आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
ममतांच्या १५ वर्षांच्या ‘जंगलराज’ला पूर्णविराम
बंगालच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवत फडणवीस म्हणाले की, ३६ वर्षांच्या कम्युनिस्ट राजवटीनंतर ममता दीदींच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीने बंगालला रसातळाला नेले. एकेकाळी आर्थिक केंद्र असलेल्या बंगालमधून ७,००० उद्योगांनी काढता पाय घेतला. देशात येणाऱ्या एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी बंगालचा वाटा ०.५ टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. मात्र, आता पंतप्रधान मोदींच्या व्हिजनमुळे ‘सोनार बांग्ला’ पुन्हा एकदा गुंतवणुकीचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
घुसखोरीविरुद्ध जनतेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
घुसखोरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री अधिक आक्रमक झाले. “ममता सरकार बांगलादेशी घुसखोरांना राजाश्रय देऊन भारतीय कागदपत्रे पुरवत होते. हा केवळ राज्याचा प्रश्न नसून भारताच्या सार्वभौमत्वाला धोका होता. बंगालच्या जनतेने मतदानातून या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. हा भारताला आतंकवादापासून वाचवणारा विजय आहे,” असे त्यांनी नमूद केले.
अमित शाहांच्या रणनीतीचा विजय
या विजयाचे श्रेय फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री आणि आधुनिक राजकारणाचे चाणक्य अमित शाह यांना दिले. शाह यांची अचूक रणनीती, नितीन नवीन यांचे संघटन आणि सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील बंगाल भाजपच्या टीमने हे अशक्य काम शक्य करून दाखवले. “एकच विश्वास, मोदी है तो मुमकिन है,” या घोषणांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरत त्यांनी भाषणाचा समारोप केला.


