मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक घडामोडी घडत आहेत. त्याची चर्चाही होत असते. त्यात अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर यांचा ‘जुदाई’ हा बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. बोनी कपूर निर्मित १९९७ सालच्या या चित्रपटातील ‘मुझे एक पल चैन ना आये’ हे गाणे प्रचंड गाजले. हे गाणे जसपिंदर नरुला यांनी गायले होते.
जेव्हा श्रीदेवी आणि बोनी कपूर ‘मुझे एक पल चैन ना आये’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त होते, तेव्हा बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना शौरी कपूर, सुपर साउंड स्टुडिओच्या जिन्यावर बसून रडत होती. जसपिंदर नरुला यांनी इतक्या वर्षांनंतर ही गोष्ट सांगितली आहे. जसपिंदर नरुला यांनी सांगितले की, जेव्हा मोना कपूरला श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या रिलेशनशिपबाबत कळले, तेव्हा ती पूर्णपणे खचून गेली होती. मोना तिची खूप चांगली मैत्रीण होती.
जसपिंदर म्हणाल्या, “मी मोना कपूरच्या खूप जवळची होते. मला अजूनही आठवतंय, मोना कपूर मला म्हणाली होती, ‘तू आत गात होतीस, तर मी सुपर साउंड स्टुडिओच्या पायऱ्यांवर बसून रडत होते. तेव्हा मला सगळं काही जाणवलं. एकीकडे घर बांधले जात होते, तर दुसरीकडे कोसळत होते’.
जसपिंदरने हेही उघड केले की रेकॉर्डिंग दरम्यान तिला कानाचा गंभीर त्रास होत होता. ती म्हणाली, माझा एक कान कफाने भरला होता आणि एक कान पूर्णपणे बंद झाला होता. मी खूप कठीण परिस्थितीत गायले. रेकॉर्डिंग सत्रानंतर गायक हरिहरनने तिला पाठिंबा दिला.


