Weather Update : देशभरातील शेतकरी आणि नागरिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो मान्सून आता केरळच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत नैऋत्य मान्सून केरळमध्ये अधिकृतपणे दाखल होण्याची दाट शक्यता आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून कोणत्याही क्षणी त्याचे आगमन होऊ शकते.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, 4 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांत तो कोकण किनारपट्टीकडे सरकेल. तळकोकणात मान्सूनची एंट्री झाल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत त्याची वाटचाल सुरू होईल. सध्याच्या अंदाजानुसार 10 जूनच्या आसपास मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो.
दरम्यान, मुख्य मान्सून येण्यापूर्वीच राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत असून उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पुढील काही तासांत जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह सरींचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विशेषतः कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या पावसाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने देशातील एकूण हंगामी पावसाचा अंदाज 92 टक्क्यांवरून 90 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्यामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


