सातारा: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला वर्धापनदिनी सातारा जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पाटण तालुक्यातील सत्यजितसिंह पाटणकर आणि काँग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष हिंदुराव पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या या खेळीमुळे शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. तसेच पाटणकर यांना प्रवेश देऊन शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना आव्हान देण्यासाठी भाजपने हा डाव टाकला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील नरिमन पॉईंट प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. या पक्षप्रवेशासाठी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, सातारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे उपस्थित होते. पाटणकर यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.


