पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या नियमित फेरीतील निवड झालेल्या ६ हजार ४०२ विद्यार्थ्यांना विविध कारणास्तव कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला. यातील बहुतांश प्रवेश कागदपत्रांची पूर्तता न केल्याने नाकारण्यात आले असून, अंतिम टण्यात या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी असेल. तसेच १ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन पुन्हा रद्द केल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.
अकरावीची पहिल्या फेरीची प्रवेशप्रक्रिया नुकतीच संपली. या फेरीत राज्यभरातून ६ लाख ३२ हजार १९४ विद्याथ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची मुदत ७ जुलै रोजी संपली. मुदतीअखेर केंद्रीभूत प्रवेश पद्धतीनुसार (कॅप) ४ लाख ३२ हजार २८७, तर कोटा पद्धतीनुसार ७५ हजार ८०९ विद्याथ्यांनी प्रवेश निश्चित केला. एकूण ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. कॅप पद्धतीनुसार २ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे.
राज्यातील ६ हजार ४०२ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून प्रवेश नाकारण्यात आला. यामध्ये विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्या २ हजार ४९५, वाणिज्य शाखेला प्रवेश घेणाऱ्या ९५६ आणि कला शाखेला प्रवेश घेणाऱ्या ७५८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण १ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केला आहे. यामध्ये विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्या ७८८, वाणिज्य शाखेला प्रवेश घेणाऱ्या ३६४ आणि कला शाखेला प्रवेश घेणाऱ्या ४३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रवेश स्वतःहून रद्द केलेले विद्यार्थी अभियांत्रिकी पदविका, आयटीआय यासारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात.
दुसरी फेरी १० जुलैपासून
अकरावीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीला गुरुवार, १० जुलैपासून सुरुवात होत आहे. १० ते १३ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग १ मध्ये दुरुस्ती, विद्यार्थ्यांना किमान १ ते कमाल १० प्राधान्यक्रमांचा समावेश करणे, नियमित फेरी १ मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. गुरुवार, १७जुलै रोजी दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर केली जाईल. १८ ते २१ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.


