कासार बालकुंदा (लातूर): लातूर आडत मार्केटला सोयाबीनचा माल घेवून जाणारा ट्रॅक्टर मालासह टाकळी गावाजवळील तलावात कोसळला. शेतकरी व चालकाने जीव मुठीत घेऊन चालत्या ट्रॅक्टरमधून उडी मारल्याने जीवितहानी टळली.
निलंगा तालुक्यातील चिलवंतवाडी येथील शेतकरी मोहन पाटील, मल्लेश मरे व ओम मरे हे शुक्रवारी दुपारी १२ च्या दरम्यान, ट्रॅक्टरमध्ये सोयाबीन घेऊन लातूर आडत मार्केटला विक्री करण्यासाठी निघाले होते. चालकाचा ट्रॅक्टरवरीलवरील ताबा सुटल्याने सोयाबीनच्या पोत्यासह टॅक्टर टाकळी येथील वनविभाग नर्सरी शेजार रोडच्या बाजूला वळणावर असलेल्या तलावात कोसळला. प्रसंगवधान राखत शेतकरी व ट्रॅक्टर उड्या मारल्याने जीवितहानी टळली.
अगदी वळणावर हा तलाव आहे. याच् रस्त्यावरुन मुलाना शाळेत घेवुन स्कूल बस व एसटी बस धावतात. या ठिकाणी संरक्षक कठडे बसविले तर असे अपघात होणार नाहीत. प्रशासनाने तात्काळ संरक्षक कठडे बसवावेत अशी मागणी मागणी उपसरपंच राम बिराजदार यांन केली आहे.


