पुणे: पुण्यात एका जोतिष्याने तरुणीला एकांतात बोलावून मंत्र देण्याच्या ऐवजी विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या संतापजनक घटनेनंतर ज्योतिषाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणार्या एका भोंदू ज्योतिषाने हे कृत्य केलं आहे. ही घटना धनकवडी भागात घडली आहे. अखिलेश लक्ष्मण राजगुरु असे अटक केलेल्या ज्योतिषाचे नाव आहे. याबाबत एका 25 वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मैत्रिणीने संबंधित ज्योतिषी पत्रिका पाहून भविष्य सांगतो, त्याच्याकडे जाऊन ये, असे सांगितले होते. फिर्यादी या त्यांच्या भावाची पत्रिका घेऊन या ज्योतिषाकडे 12 जुलै 2025 रोजी गेल्या. जोतिष्याने पत्रिका पाहिल्यानंतर “तुमच्या भावाला एक वनस्पती द्यायची ती मागवून घेतल्यावर तुम्ही या,” असं सांगितले होते.
त्यानंतर 18 जुलै रोजी ज्योतिषाने फिर्यादी यांना वनस्पती घ्यायला उद्या या, असं सांगितलं. त्यानुसार फिर्यादी 19 जुलै रोजी जेव्हा जोतिष्याच्या धनकवडी येथील कार्यालयात गेल्या, तेव्हा त्याने “आणलेली वनस्पती तुमच्या डोक्यावर ठेऊन मंत्र म्हणावे लागतील” असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांना संशय आल्याने त्या ठिकाणाहून निघाल्या. दरम्यान, अखिलेश राजगुरु या भोंदु ज्योतिषाने अचानक फिर्यादींना मिठी मारत त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी यांनी याबाबतची माहिती भावाला फोन करुन कळवत पोलिसात तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच सहकारनगर पोलिसांनी भोंदु ज्योतिषाच्या कार्यालयावर छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेऊन अटक केली.


