केनिंगटन: भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये सध्या ५ कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू असून, या मालिकेत भारतीय क्रिकेट संघ २-१ ने पिछाडीवर आहे. आजपासून अखेरचा सामना खेळविण्यात येणार आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. अखेरच्या सामन्यात विजय संपादन करून मालिका खिशात टाकण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघाचा प्रयत्न असणार आहे.
पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यातून जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने माघार घेतली आहे. तसेच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला ऑल ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने नारायण जगदीशनला पर्यायी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान दिले आहे. तसेच ध्रुव जुरेलही संघात सामील असल्याने भारतीय संघ व्यवस्थापनासमोर संघ निवड करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तसेच आकाशदिपही दुखापतीतून सावरून संघात सामील झाला आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे गौतम गंभीर यांनी सांगितले आहे.
अर्शदिपसिंगही संघात असल्यामुळे त्यालाही पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्याने ९ एकदिवसीय आणि ६३ टी २० सामने खेळले असून, एकदिवसीय सामन्यात १४ तसेच टी २० मध्ये ९९ गडी बाद केले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेट मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघाचा भाग असलेल्या अर्शदिपसिंगला पहिल्या ३ सामन्यात संधी मिळाली नव्हती. मात्र चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या सरावादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाल्याने या कसोटी क्रिकेट सामन्याला मुकावे लागले होते. भारतीय क्रिकेट संघाकडे अंशुल कंबोज आणि शार्दूल ठाकूर हे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन पाचव्या सामन्यात कोणते बदल करणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये ५ कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना केनिंगटन ओव्हल लंडन येथे खेळविण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड क्रिकेट संघाने २-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. अखेरच्या सामन्यात विजय संपादन करून मालिका खिशात टाकण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघाचा प्रयत्न असणार आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाने आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार बेन स्ट्रोक्सने उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे संघाचे कर्णधारपद ओली पोपकडे सोपविण्यात आले आहे. इंग्लंड क्रिकेट संघाने जाहीर केलेल्या संघात ३ बदल केले असून, यामध्ये जोफ्रा आर्चर, लियम डॉसन आणि ब्रायडन कार्स यांना विश्रांती देण्यात आली आहे. बदली खेळाडू म्हणून जेकब बेथेल, गस अॅटकिंसन आणि जॉश टंग यांना स्थान देण्यात आले आहे.


