रायगड : अलिबाग तालुक्यातील कुर्डूस गावात 33 वर्षांची अनोखी परंपरा जपली जाते.येथे गावकरी ‘एक गाव, एक दहीहंडी’ उपक्रमात सहभागी होतात. गावाच्या मध्यभागी असलेल्या 40 फूट खोल विहिरीवर 25 फूट उंचीवर दहीहंडी बांधली जाते. ही हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके थर रचून उंच उडी मारतात, पण अनेकदा अपयशी ठरतात.
हंडी फोडल्यानंतर गोविंदांना विहिरीत पडून पोहण्याचा आनंदही मिळतो. या अनोख्या उत्सवाला पाहण्यासाठी जिल्हाभरातून अनेक नागरिक मोठी गर्दी करत असतात. विशेषत: महिलांचा सहभाग लक्षणीय असतो.
दुसरीकडे, सुधागड तालुक्यातील जांबुलपाडा गावात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण दहीहंडी साजरी होते. येथे गोविंदा पथके नाचत-खेळत, अंगावर आसूडाचे फटके खात दहीहंडी फोडतात. हा रोमांचकारी आणि पारंपरिक गोपाळकाळा सोहळा पाहण्यासाठीही मोठी गर्दी उसळते. रायगडच्या या दोन्ही गावांमधील दहीहंडी उत्सवाची खासियत राज्यभरात चर्चेचा विषय ठरते.
मुंबईत 32 वर्षीय गोविंदा मृत्यू, ३० गोविंदा जखमी
मुंबईत 32 वर्षीय गोविंदा जगमोहन शिवकुमार चौधरी याचा दहीहंडीचा रोप बांधताना तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी अवस्थेत त्याला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तसेच दहीहंडी उत्सवात आतापर्यंत एकूण ३० गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. विविध सरकारी तसेच बीएमसी रूग्णालयात जखमी गोविंदांवर उपचार सुरू आहेत. १५ गोविंदांवर खासगी आणि सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, १५ गोविंदांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.


