मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने 15,631 पदांसाठी पोलीस भरतीला मान्यता देणारा शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार, गृह विभागाने पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यास मंजुरी दिली आहे.
शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे
पदांची संख्या आणि संवर्ग :
पोलीस शिपाई : 12,399
पोलीस शिपाई चालक: 234
बॅण्डस्मन: 25
सशस्त्र पोलीस शिपाई: 2,393
कारागृह शिपाई: 580
एकूण: 15,631 पदे
भरतीचा कालावधी : 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त झालेली किंवा रिक्त होणारी पदे भरण्यास मान्यता.
परीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग: ₹450/-
मागास प्रवर्ग: ₹350/-
जमा झालेले शुल्क भरती प्रक्रियेसाठी आवश्यकतेनुसार खर्च करण्यास परवानगी.
विशेष सवलत: 2022 आणि 2023 मध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकवेळची विशेष संधी म्हणून अर्ज सादर करण्याची मुभा.
परीक्षा पद्धती: सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 च्या निर्णयांमधील तरतुदींना शिथिलता देऊन OMR आधारीत लेखी परीक्षा आणि घटकस्तरावर भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना दिलासा
महाराष्ट्रात लाखो तरुण-तरुणी पोलीस दलात सामील होण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. या शासन निर्णयामुळे 15,631 जागांसाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही दिवसांत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून, उमेदवारांना तयारीला गती देण्याची संधी आहे. गृह विभागाने जारी केलेल्या जीआरमध्ये भरती प्रक्रियेच्या सूचनांचा समावेश असून, लवकरच अधिकृत जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया जाहीर होईल.


