पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 24 वर्षीय गौतम गायकवाडच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला गौतम तानाजी कड्यावरून पाय घसरून दरीत पडल्याचा दावा त्याच्या मित्रांनी केला होता. मात्र, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील एका व्यक्तीने या प्रकरणाला गूढ बनवले आहे. फुटेजमध्ये गौतमसारखा दिसणारा एक तरुण पळताना आणि लपताना दिसल्याने पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण?
साताऱ्याच्या फलटणचा रहिवासी असलेला गौतम गायकवाड सध्या हैदराबाद येथे वास्तव्यास आहे. बुधवारी (20 ऑगस्ट) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास तो पाच मित्रांसह (महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे, सूरज माळी) सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता.
तानाजी कड्याजवळ असताना गौतमने ‘लघुशंकेसाठी जातो’ असे सांगून मित्रांना मोबाइल देऊन बाजूला गेला. बराच वेळ परत न आल्याने मित्रांनी शोधाशोध केली, तेव्हा त्याची चप्पल कड्याजवळ सापडली, पण गौतमचा पत्ता लागला नाही. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मित्रांनी पोलिसांना संपर्क साधला.
सीसीटीव्ही फुटेजमुळे खळबळ
पुणे ग्रामीण पोलिस, हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने गेल्या दोन दिवसांपासून सुमारे 1,000 फूट खोल दरीत शोधमोहीम राबवली. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे शोधकार्याला अडथळा आला. रात्री 11 वाजता अंधारामुळे शोध थांबवण्यात आला आणि गुरुवारी सकाळी 6 वाजता पुन्हा सुरू झाला.
दरम्यान, कोंढणपूर येथील वनसंरक्षण समितीच्या नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती हुडी घालून तोंड लपवत पळताना दिसली. ही व्यक्ती गौतम आहे की दुसरे कोण, याबाबत स्पष्टता नाही. गौतमने पिवळा रेनकोट घातला होता, तर फुटेजमधील व्यक्ती हुडी घातलेली आहे, यामुळे संभ्रम वाढला आहे.
अपघात की नियोजित कट?
या फुटेजमुळे पोलिसांचा तपास आता दोन दिशांनी सुरू आहे. पहिली शक्यता आहे की गौतम खरोखरच दरीत पडला असावा, आणि दुसरी शक्यता आहे की त्याने जाणूनबुजून गायब होण्याचा प्रयत्न केला असावा. पोलिसांनी फुटेज गौतमच्या मित्र आणि नातेवाइकांना दाखवले, पण त्यांना ओळख पटवता आली नाही. “जर फुटेजमधील व्यक्ती गौतम असेल, तर त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते,” असे हवेली पोलिसांनी सांगितले.


