मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यावर बायोपिक बनवला जात आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाणार आहे. तसेच, तो चित्रपटगृहात कधी प्रदर्शित होईल हे देखील लवकरच सांगितले जाणार आहे. त्यानुसार, कोलकातामध्ये चित्रपटाची तयारी सुरू आहे.
दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवणे, निर्माता अंकुर गर्ग आणि लव रंजन कोलकाता येथे पोहोचले आहेत. लोकेशनबाबत तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणांना भेटी देण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर अनेक स्टेडियमचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे. आर्यन क्लब अंतर्गत येणाऱ्या दुखी राम क्रिकेट अकादमीलाही भेट दिली. येथे सौरव गांगुलीने बालपणात क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हे सर्वजण सौरव गांगुलीला त्याच्या घरी भेटायला गेले. राजकुमार राव सौरवच्या भूमिकेत दिसणार आहे. राजकुमार ऑक्टोबर महिन्यात कोलकाता येथे पोहोचेल, असे सांगण्यात आले आहे.
राजकुमार हा सौरवसोबत एक महिना राहणार आहे. जेणेकरून तो सौरव गांगुली यांच्या दिनचर्या शिकू शकेल. यादरम्यान गांगुली यांच्या आयुष्याबद्दल जवळून जाणून घेऊ शकतो. राजकुमार राव उजव्या हाताने खेळतो, तर सौरव डाव्या हाताने खेळायचा. त्यामुळे राजकुमार राव याच्यासाठी हे थोडे आव्हानात्मक असणार आहे.


