Marathwada Heavy Rain: मराठवाडा, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये सलग पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे हजारो नागरिक अडकले असून, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा रेस्क्यू व मदत कार्यात गुंतलेली आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पूरामुळे लोकांना हेलिकॉप्टर आणि बोटींच्या साह्याने सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 5,320 गावांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, अठरापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये 1,827,000 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. 18 सप्टेंबरपासून पुढील काही दिवसांत अजून 491,000 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
जीवितहानी आणि वित्तहानी
मराठवाड्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यात लातूरमध्ये 3, धाराशिव 1, बीड 2 आणि नांदेडमध्ये 1 मृत्यू समाविष्ट आहे. पावसामुळे 150 जनावरेही बळी गेली आहेत, ज्यात बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली आणि संभाजीनगर जिल्ह्यांचे प्राण्यांचा समावेश आहे. तथापी, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे 76 ठिकाणी नुकसान झाले आहे. यात 6 ठिकाणी रस्ते वाहून गेले असून 5 ठिकाणी पूल वाहून गेले आहे. तथापी, 327 पक्की घरांची पडझड झाली अशून 2 शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
पूरग्रस्त भागातील मदत व बचावकार्य
सध्या 67 गावांचा संपर्क तुटलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11, जालना 2, परभणी 30 आणि लातूर 20 गावांचा संपर्क तुटलेला आहे. पूरात अडकलेल्या सुमारे 214 नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले गेले असून, मराठवाड्यात एकूण 548 लोकांना स्थलांतरित केले आहे. यासाठी बीड, धाराशिव आणि परभणीमध्ये बचाव पथकाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ आणि आर्मी मिलून धाराशिव जिल्ह्यातील वाघेगव्हाण येथील 150 लोकांची सुटका करत आहेत.
पीक नुकसान व मदत
यंदाच्या खरीप हंगामात मराठवाड्यात जवळपास बाराशे मंडळात अतिवृष्टी झाली आहे. आतापर्यंत जुलै-ऑगस्ट महिन्यातील नुकसानभरपाईसाठी 696 कोटी मंजूर झाले आहेत. अतिरिक्त 721 कोटी मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, विम्याद्वारे तातडीची मदत मिळणार नाही. पीक कापणी नंतरच विम्याद्वारे भरपाई मिळेल, असे सांगितले गेले आहे.


