Pune Traffic: वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या पुणेकरांना लवकरच सुटकेचा श्वास मिळणार आहे. शहरातील तब्बल 500 सिग्नल चौकांवर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (ITMS) बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या प्रकल्पावर 1100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ही महत्त्वाकांक्षी योजना पुढील तीन महिन्यांत सुरू होईल. या नव्या प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनांची संख्या, वेग, प्रवासाचा कालावधी आणि पीक अवरमधील वाहतुकीचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानुसार सिग्नल आपोआप बदलले जातील. यामुळे अनावश्यक थांबे कमी होऊन वाहतूक अधिक वेगाने आणि सुरळीतपणे सुरू राहील.
विशेष म्हणजे, सिग्नल सिंक्रोनायझेशनमुळे वाहनांना सलग हिरवा सिग्नल मिळण्याची शक्यता वाढेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ही प्रणाली राजकीय दौऱ्यांमुळे होणारी कोंडी कमी करण्यास मदत करेल. तसेच रुग्णवाहिकांसाठी ग्रीन कॉरिडॉर त्वरित उपलब्ध करून देणेही शक्य होईल, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविणे सोपे जाईल.
आधीचा 102 कोटींचा प्रकल्प फसला
याआधी स्मार्ट सिटी अंतर्गत अॅडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ATMS) साठी 102 कोटी खर्चून 125 सिग्नल बसवण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी समस्या तशीच राहिली. त्यामुळे आता 1100 कोटींच्या नव्या प्रकल्पाकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, हा प्रकल्प पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


