नवी दिल्ली : ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी दलित विद्यार्थ्यांना मोठी भेट दिली आहे. दिल्लीतील दलित विद्यार्थ्यांना विदेशात मोफत शिक्षण घेण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान शिष्यवृत्ती’ देण्याची घोषणा केजरीवालांनी शनिवारी केली. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या दलित विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक, राहण्याचा व प्रवासाचा खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचे केजरीवालांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील महिलांना दरमहा १००० रुपये देणे, ऑटोरिक्षा चालकांना निधी आणि या पाठोपाठ आता दलित समुदायातील विद्यार्थ्यांचा विदेशातील शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान शिष्यवृत्ती’ देण्याची घोषणा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली. ते म्हणतात की, दलित कुटुंबातील मुलांचा विदेशातील विद्यापीठांमधील शिक्षणाचा व येण्या-जाण्याचा खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे.
दलित समाजातील कोणताही विद्यार्थी पैसे नसल्यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून आम्ही डॉ. आंबेडकर शिष्यवृत्ती योजना लागू करीत आहोत. दलित कुटुंबातील मुलांची जगातील अव्वल विद्यापीठात शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर त्यांनी बिनधास्तपणे तिथे प्रवेश घ्यावा. त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, निवास आणि प्रवास खर्च आम्ही उचलणार आहोत, असे केजरीवालांनी स्पष्ट केले. डॉ. आंबेडकरांनी विदेशात शिक्षण घेऊन दोन वेळा पीएच. डी. पूर्ण केली.
पण स्वतंत्र भारतात कोणत्याही मुलाला विदेशात शिक्षण घेण्यात अडथळा येऊ नये, याची खबरदारी आम्ही घेत आहोत. शासकीय अधिकाऱ्यांनाही ही योजना लागू असेल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजप व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खिल्ली उडवली. त्यामुळे आंबेडकरांचे अनुयायी व्यतिथ झाले. म्हणून आमच्या सरकारने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान शिष्यवृत्ती योजना’ लागू करीत त्यांना सनसनीत चपराक दिल्याचा टोला त्यांनी लगावला.


