अलिगढ : उत्तर प्रदेशच्या अलिगढ जिल्ह्यात एका घरातील बाथरूममध्ये गिझरमधून गॅसगळती होऊन तिथे अंघोळ करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीवर मृत्यू ओढावल्याची दुर्दैवी घटना शनिवारी उजेडात आली. अलिगढच्या कुलदीप विहार कॉलनीत राहणाऱ्या एका घरातील मुलगी अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. यावेळी तिची आई शेजारच्या दुकानावर सामान आणण्यासाठी गेली होती.
ती परत आली. मात्र, मुलगी बाथरूममधून बाहेर आलीच नव्हती. तेव्हा तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली व तिने बाथरूमचा दरवाजा उघडला. यावेळी गिझरमधून गॅसगळती होऊन मुलगी बेशुद्ध पडल्याचे दिसून आले. तिला ताबडतोब जवाहरलाल नेहरू रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु तोपर्यंत ती मरण पावली होती. डॉक्टरांनी तपासणीअंती या विद्यार्थिनीला मृत घोषित केले.


