Pune Crime: पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ कोथरूडमधील गोळीबारानंतर फरार झाला असून, तो सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी, घायवळच्या आर्थिक मुळावर घाव घालत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गँगस्टर घायवळ, त्याचे कुटुंबीय आणि त्याच्या मालकीच्या व्यावसायिक आस्थापनाशी संबंधित 10 बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या बँक खात्यात तब्बल 38 लाख 26 हजार रुपये आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
मकोकाखाली 10 जणांवर कारवाई
कोथरूडमध्ये घायवळ टोळीच्या सदस्यांनी दोन व्यक्तींवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात कट रचल्याच्या आरोपाखाली टोळीप्रमुख घायवळसह 10 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई सुरू आहे. फरार घायवळच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली असून तपास गुन्हे शाखेकडून पुढे नेला जात आहे.
हेही वाचा – पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला फरार; पासपोर्ट मिळाला कसा? पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, पोलिसांनी घायवळच्या पासपोर्टबाबत संबंधित विभागाकडे माहिती मागवली आहे. मात्र, अपेक्षित माहिती अद्याप न मिळाल्याने संशय निर्माण झाला आहे. गुन्हेगारी टोळ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी निर्णायक कारवाईचा धडाका लावला आहे. गँगस्टरविरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी पोलिसांकडे असेल, असे आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.


