Eknath Shinde : गोरेगावमधील नेस्को सेंटर येथे शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. भाषणात त्यांनी विरोधी पक्षावर जोरदार फटाकेबाजी केली. त्यांच्या भाषणाचा खरा मुद्दा शेतकरी, राज्यातील पूरस्थिती होती. मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरग्रस्तांना सर्वोपरि मदत करणार असल्याचे आश्वासनही दिले आहे.
आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, ”पुरामुळे बळीराजा कोलमडून गेला आहे. पण त्यांनी धीर सोडू नये, कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. तुमचे भाऊ इकडे आहेत. तुमचे जीवन जे उद्ध्वस्त झालंय त्याला उभारी देण्याचे काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना, महायुती सरकार शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. मला शेतकऱ्याचे कष्ट, वेदना, दुःख मला माहीत आहेत. शेतकऱ्यांना मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल. असे विश्वास त्यांनी दिला.
आधी दुष्काळ पडला, आता पूर आला. शेतकऱ्यांना अन्नधान्य, जीवनाश्यक वस्तू, जनावरांना चारा देण्याचे काम शिवसेनेने केले. आताही कोणत्याही अटी, शर्ती बाजूला ठेवून बळीराजाला मदतीची हात दिला आहे. संकट मोठे आहे. लोकं आम्हाला सांगत होती, अनेक वर्षांत आम्ही इतका पाऊस पाहिला नाही. सगळं उद्ध्वस्त झालंय.
पुढे बोलताना त्यांनी सर्वात मोठी आणि हृदयस्पर्शी घोषणा केली. अतिवृष्टीमुळे ज्या कुटुंबांतील मुला-मुलींची लग्नं ठरलेली आहेत आणि जे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, त्या सर्वांची लग्नं लावण्याची संपूर्ण जबाबदारी शिवसेना पक्ष उचलणार असल्याचं सांगितलं.


