Navi Mumbai Airport Name: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या नावासाठी राज्याने पाठवलेली शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मान्य केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, दि. बा. पाटील यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही नाव विचारात घेतले गेले नव्हते. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही मागणी आता पूर्ण होत आहे.
नवी मुंबई विमानतळावर स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त सातत्याने दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करत होते. यासाठी जून 2021 मध्ये आंदोलनही झाले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, आंदोलनानंतर महायूती सरकार सत्तेवर आले आणि त्याच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रस्ताव मंजूर झाला, फक्त केंद्राच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा होती.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी करणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक घेऊन हा मुद्दा मार्गी लावला. केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता विमानतळाच्या नामकरणाचा मार्ग सुकर झाला आहे.


