TET Exam: शिक्षक पात्रता परिक्षेसाठी लाखो उमेदवार अर्ज भरत आहेत. काहीचे अर्ज भरणे अजूनही बाकी आहेत. त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे. नियोजतीत शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी -२०२५) रविवारी (दि.२३) नोव्हेंबर रोजी होणार आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदतपूर्वी दि. ३ ऑक्टोबरपर्यंत होती.
मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे अनेक उमेदवारांना अडचणी आल्याने अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता उमेदवारांना ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी दि. ४ ऑक्टोबर ते दि. ९ ऑक्टोबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे.
तसेच तांत्रिक कारणांमुळे परीक्षा शुल्क भरता न आलेल्या उमेदवारांनादेखील नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दि. ९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शुल्क भरण्याची संधी दिली आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज भरून शुल्क भरावे, असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी केले.


