Nagpur News: नागपूर शहराला हादरवून सोडणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पर्यटनासाठी युरोप दौऱ्यावर गेलेल्या नागपूरच्या प्रसिद्ध ‘गुलशन प्लाझा’ हॉटेलचे मालक जावेद अख्तर (57) आणि त्यांची पत्नी नदिरा यांचा इटलीमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्यांची तीन मुले आरजू (25), शिफा (21) आणि जाजेल (15) गंभीर जखमी असून, सध्या इटलीतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी आरजूची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
युरोप सहलीचा आनंद क्षणात शोकात बदलला
सीताबर्डी परिसरातील रहिवासी असलेले अख्तर कुटुंब 22 सप्टेंबर रोजी युरोप टूरसाठी रवाना झाले होते. फ्रान्समधील पर्यटनाचा टप्पा संपवून ते इटलीतील ग्रोसेटो परिसरात पोहोचले. गुरुवारी सकाळी सुमारास ते मिनीबसने पर्यटनस्थळांकडे जात असताना, नऊ आसनी वाहनाचा भीषण अपघात झाला. धडकेचा जोर एवढा होता की, जावेद आणि नदिरा अख्तर यांचा जागीच मृत्यू झाला.
मदतीसाठी नातेवाईक रवाना; सरकार सक्रिय
या घटनेची माहिती मिळताच अख्तर कुटुंबाचे दोन नातेवाईक तातडीने इटलीला गेले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोममधील भारतीय दूतावासाशी थेट संपर्क साधून मदतीचा समन्वय साधला आहे. मृतदेह भारतात आणण्यासाठी आणि जखमी मुलांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आवश्यक त्या सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
नागपूरमध्ये शोककळा
या अपघातामुळे सिव्हिल लाइन्समधील अख्तर कुटुंबाच्या घरासमोर शोकाकुल वातावरण आहे. परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवार दुःख व्यक्त करत आहेत. दरवर्षी परदेश प्रवास करणारे हे कुटुंब नेहमीच उत्साहात दिसत असे, मात्र या सहलीने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागपूरकरांनी जखमी मुलांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना सुरू केली आहे.


