Ratnagiri Crime News: कर्नाटकातील निपाणी येथील एका कॉलेज तरुणीचं अपहरण करून तिला 13 दिवस कैदेत ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी आरोपीच्या तावडीतून सुटका करून रस्त्यावरून पळत असताना, एका रिक्षाचालकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे तिचे प्राण वाचले. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, माखजन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इरफान खान नावाचे रिक्षाचालक नेहमीप्रमाणे कोंडिवरेहून आरवलीच्या दिशेने जात असताना, रस्त्यावरून धावत येणारी एक मुलगी त्यांच्या नजरेस पडली. त्यांनी रिक्षा थांबवून तिची विचारपूस केली असता, ती रडत रडत म्हणालीमला कोणीतरी पळवून आणलं आहे. इरफान खान यांनी वेळ न दवडता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांच्याशी संपर्क साधला आणि मुलीला थेट माखजन पोलीस ठाण्यात सोडलं. त्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला.
चौकशीदरम्यान पीडित तरुणीने सांगितले की ती बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील रहिवासी असून कागल येथील कॉलेजमध्ये अकरावी कॉमर्समध्ये शिक्षण घेत आहे. २० सप्टेंबर रोजी ती कॉलेजला जात असताना तिच्या वर्गमित्राने हत्याराचा धाक दाखवत कागल बसस्टँडवरून तिचं अपहरण केलं. आरोपीने तिचा मोबाईल नष्ट केला आणि जबरदस्तीने तिला पंढरपूर, मुंबई दादर, कराड आणि शेवटी रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड गावात डांबून ठेवलं.
या काळात आरोपीने तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचं, तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचं मुलीने पोलिसांना सांगितलं. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध अपहरण आणि कैदेत ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू असून आरोपीच्या अटकेसाठी शोधमोहीम राबवली जात आहे.


