Pune News: वादग्रस्त ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात फरार असलेल्या निवृत्त आयएएस अधिकारी दिलीप खेडकर यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकावर आरोप आहे की त्यांनी 22 वर्षीय ट्रक क्लिनर प्रल्हाद कुमार याला मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवले.
काय आहे नेमकं प्रकरण?
दरम्यान, 12 सप्टेंबरला, नवी मुंबईतील मुलुंड-आयरोली लिंक रोडवर प्रल्हाद कुमारच्या काँक्रीट मिक्सर ट्रकने खेडकर यांची लँड क्रूझर गाडी धक्का दिला. या घटनेनंतर संतापलेल्या खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकाने प्रल्हाद कुमार याला मारहाण करत गाडीत बसवले आणि पोलिस ठाण्यात नेतो असे सांगितले. तथापी, 14 सप्टेंबरला, प्रल्हाद कुमारला पोलिसांनी सुरक्षित सोडवले. त्यानंतर खेडकर फरार झाले होते. 6 ऑक्टोबरला त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
हेही वाचा –Manorama Khedkar: मनोरमा खेडकर पुन्हा फरार; बंगल्यावर चिकटवलेली नोटीस फाडली
याशिवाय, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांच्यावरही पोलिस तपासात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नोटीस बजावूनही त्यांनी चौकशीसाठी सहकार्य केले नाही. 6 वाजल्यानंतर हजर झाल्याने कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप न्यायालयात नोंदवण्यात आला. मनोरमा खेडकर यांना 15 दिवसांपूर्वी स्थानिक न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, मात्र याबाबत पोलिसांकडे माहिती नव्हती.
तथापी, मनोरमा खेडकर यांच्यावर पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तेवर कब्जा मिळवण्याचे गुन्हे दाखल आहेत. तसेच, शासकीय अधिकाऱ्यांशी उर्मट वर्तन केल्याच्या तक्रारीही नोंदवल्या आहेत. या सगळ्यामुळे खेडकर कुटुंब पुन्हा चर्चेत आले आहेत.


