पुणे: नीलेश घायवळविरुद्ध कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर पाच ते सहा गुन्हे नोंदवले गेले आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास वेगात सुरू आहे. गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशाचा वापर करून घायवळने पुण्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. विशेष म्हणजे, त्याचा मुलगा सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत असून त्या शिक्षणाचा खर्च कोणत्या स्त्रोतातून करण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे. या अनुषंगाने पुणे पोलिसांनी परदेशी विद्यापीठाशी थेट संपर्क साधून शिक्षण फी भरण्याची संपूर्ण माहिती मागवली आहे. आर्थिक स्रोत आणि व्यवहारांबाबत पारदर्शकता मिळवण्यासाठी ही चौकशी निर्णायक ठरू शकते.
संपूर्ण आर्थिक जाळ्याचा पर्दाफाश
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, नीलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार असून, त्याने गुन्हेगारी मार्गाने मोठा आर्थिक फंड उभारला आहे. या फंडाचा मागोवा घेण्यासाठी आणि पैशांचा स्रोत शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी झालेले आर्थिक व्यवहारही तपासले जाणार आहेत. यासाठी संबंधित विद्यापीठाशी पत्रव्यवहार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांच्या या भूमिकेमुळे घायवळच्या संपूर्ण आर्थिक जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
विविध बेकायदेशीर मार्गाने संपत्ती मिळवली पुणे पोलिसांनी आतापर्यंत नीलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांची 10 बँक खाती गोठवली आहेत. याशिवाय, त्याच्या आणि त्याच्या भावाच्या नावावर असलेल्या लाखो रुपयांच्या मालमत्तांवर सील लावण्यात आले आहे. या सर्व कारवायांचा उद्देश म्हणजे घायवळ टोळीच्या आर्थिक मुळावर गदा आणणे. पोलिसांच्या माहितीनुसार, घायवळ आणि त्याच्या टोळीने विविध बेकायदेशीर मार्गाने संपत्ती मिळवली असून, त्यातून अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. आर्थिक नाकेबंदीच्या माध्यमातून त्याच्या टोळीच्या हालचालींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गुन्हेगारी नेटवर्कचाही मोठा उलगडा
याशिवाय, कोथरूड परिसरातील एका अपार्टमेंटमधील दहा सदनिकांवर नीलेश घायवळने बेकायदेशीर ताबा मिळवला होता, असे पोलिस तपासात समोर आले आहे. या सदनिका भाड्याने देऊन घायवळ नियमित आर्थिक फायदा घेत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या सर्व सदनिका खाली करून सील करण्याचे आदेश दिले आहेत. कोथरूड गोळीबारानंतर घायवळविरुद्ध सुरू झालेल्या कारवाईची ही सलग तिसरी मोठी पायरी ठरली आहे. पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या या आर्थिक चौकशीतून शहरातील इतर गुन्हेगारी नेटवर्कचाही मोठा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


