ठाणे: आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन पक्षांनी ठाण्यात एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ठाण्यात ठाकरे ठिकऱ्या उडवतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, ठाण्यात आम्ही आणि मनसे मिळून निवडणूक लढवणार आहोत आणि सत्ता स्थापन करणार आहोत. आमचा नारा आहे ‘अबकी बार 75 पार’. भाजपचा ‘70 पार’ नारा आम्ही पाचने मागे टाकू. दोन ठाकरे सब पे भारी! संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण तापले आहे.
सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी राऊतांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन भावांची एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्याने ठाण्यातील निवडणूक समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावरही राऊतांनी प्रतिक्रिया दिली. मनसेबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. काँग्रेस हा स्वातंत्र्यलढ्यातून उभा राहिलेला राष्ट्रीय पक्ष आहे, आणि तो आजही आपल्या ठाम भूमिकेवर आहे, असं राऊतांनी स्पष्ट केलं.
तथापी, भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव व राज ठाकरे यांच्यावर टोला लगावत, त्यांचं हिंदुत्व टिळक भवनात विरलं, असं म्हटलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, राज ठाकरे यांच्याकडे चहासाठी जाऊ नका आणि नाटक करू नका. भाजपचा रंग म्हणजे भ्रष्टाचाराचा रंग. आता भाजपमध्येच काँग्रेस-राष्ट्रवादीवाले दिसतात. स्वतःची पोरं जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार? असा खोचक सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.


