अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांचे भविष्यातील राजकीय पाऊल सध्या मतदारसंघ आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारेश्वर साखर कारखान्यास ४० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याने ढाकणे यांच्या आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील भूमिका याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
गत विधानसभा निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाली होती, अखेर भाजपच्या मोनिका राजळे यांनी बाजी मारली. राष्ट्रवादीच्या प्रतापराव ढाकणे व माजी आ. चंद्रशेखर घुले, जनशक्तीच्या हर्षदाताई काकडे यांना पराभव पत्करावा लागला होता. आता हे सर्व नेते पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरू इच्छित असल्याने त्यांच्या राजकीय भूमिका काय असतील, हा सर्वांसाठी मोठा प्रश्न बनलेला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, ढाकणे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे वाढलेली जवळीक आणि सुमनताई ढाकणे प्रतिष्ठानकडून भरीव आर्थिक मदत यामुळे काही महिन्यांपासून त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा जोर धरत आहे. मात्र प्रतापराव ढाकणे यांनी अद्याप कोणतीही राजकीय स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. ते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या प्रदेश सरचिटणीस आहेत आणि शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात त्यांची राजकीय भविष्यकाळात भूमिका नेमकी काय असेल, याकडे मतदारसंघात आणि राजकीय विश्लेषक यांचे लक्ष लागले आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मैत्रीपूर्ण पण तिरंगी चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता दिसत आहे.


