Pune Crime News: पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर बारामतीतील प्रसिद्ध उद्योगपतीने अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली असून, आरोपी उद्योगपती मनोज कुंडलिक तुपे याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, आरोपी तुपेने स्वतःला मोठा व्यावसायिक असल्याचे सांगत तिच्याशी ओळख वाढवली. मी तुला आणि तुझ्या मैत्रिणीला चांगल्या नोकरीवर ठेवतो, असं आश्वासन देत त्याने तरुणीचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर दोघांमध्ये नियमित फोनवरून संपर्क सुरू झाला.
हेही वाचा – डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला पाठवलेला शेवटचा मेसेज काय होता? धक्कादायक सत्य आलं समोर
दरम्यान, मे 2021 मध्ये पीडिता एमपीएससी अभ्यासासाठी पुण्यात आली. काही महिन्यांनी, ऑगस्टमध्ये आरोपीने तिला जेवणासाठी बोलावलं. परत सोडण्याच्या बहाण्याने हडपसर परिसरात गाडी थांबवून तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही आरोपीने पुण्यातील विविध हॉटेल्समध्ये नेऊन ‘लग्न करीन’ असं सांगत अनेकदा अत्याचार केले.
लग्नाचे आमिष आणि नंतरचा धोका
ऑक्टोबर 2022 मध्ये तरुणीचं लग्न झालं, परंतु वैवाहिक आयुष्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर ती विभक्त राहू लागली. या काळात पुन्हा आरोपी तुपेने संपर्क साधला आणि “आपण लग्न करू” असं सांगून पुन्हा तिच्याशी संबंध ठेवले. मात्र, जेव्हा पीडितेने लग्नाचा विषय पुढे आणला, तेव्हा तुपे चिडून भांडणे करायचा आणि अखेर “माझं समाजात नाव आहे, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही” असं सांगून त्याने काढता पाय केला.
धमक्या आणि ब्लॅकमेलिंग
पीडितेने तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच वारंवार शारीरिक संबंध ठेवून गोळ्या घेण्यास भाग पाडले, असा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असून, आरोपी उद्योगपतीविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणामुळे समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.


