पुणे : समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात अर्जदार यांच्यासाठी महत्त्वाची सूचना असून, या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही कॉम्प्युटरबेस ऑनलाईन परीक्षा ४ मार्च ते १९ मार्च २०२५ रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित केली आहे.
वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक, समाजकल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गासाठी ही ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. उमेदवारांना २५ फेब्रुवारी २०२५ पासून प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने या https://sjsa.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या सूचनांसंदर्भात माहितीचा समावेश असेल अशी माहिती समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले.


