Pune News: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMP) महिला सशक्ती करणावर भर देत कार्यरत महिला वाहकांना (कंडक्टर) आता चालक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी पीएमपी प्रशासनाने महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च’ संस्थेच्या माध्यमातून महिला कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला महिला कर्मचाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 15 ते 20 महिला वाहकांनी चालक प्रशिक्षणासाठी तयारी दाखवली आहे.
सध्या पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. हा उपक्रम सक्सेसफुल झाल्यास मोठ्या प्रमाणात महिलांच्या हाती स्टेअरिंग येईल. संस्थेमध्ये सध्या 8 हजारांहून अधिक महिला कर्मचारी कार्यरत आहेत.
नव्या कायमस्वरूपी पदभरतीला स्थगिती देण्यात आली आहे. त्याऐवजी इच्छुक महिला वाहकांना चालक प्रशिक्षणाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणादरम्यान महिला वाहकांना IDTRकडून परवाना (लायसन्स) काढून देण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच पुण्याच्या रस्त्यावर पीएमपीच्या बसच्या स्टेअरिंगवर महिला चालक दिसतील. पुणे महानगर परिवहन महामंडळात सध्या एकूण 220 महिला वाहक कार्यरत आहेत. यापैकी 212 महिला वाहक (कंडक्टर) कायमस्वरूपी असून, आठ महिला वाहक या बदली कामगार म्हणून कार्यरत आहेत.


