कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील राहणारे ऋषीकेश जगन्नाथ इंगवले यांची इंडियन एअर फोर्समध्ये क्लास-१ फ्लाईंग ऑफिसरपदी निवड झाली. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेमध्ये सन २०२४ मध्ये ९ ते १० लाख उमेदवारांमधून संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उंचावण्याचे कार्य केले. त्यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्र हायस्कूल येथून झाले. ते एनसीसी सार्जंट होते, तर दहावीमध्येही टॉपर होते. त्यांनी भारती विद्यापीठ येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले. त्यामध्ये त्यांना शिवाजी विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाले.
एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे परीक्षा, तर दिल्ली येथे मेडिकल टेस्ट झाली. भारतीय संरक्षण दलात काम करण्याचे लहानपणापासून ध्येय समोर ठेवून, कठीण परिस्थितीत वेगवेगळ्या संकटांचा सामना करत त्यांनी हे यश मिळवले आहे. काही दिवसांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपले असताना न डगमगता संघर्ष चालू ठेवत त्यांनी यशाला गवसणी घातली.


