Nashik News: नाशिक पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निर्धार केला असून शहरात धडक कारवाई सुरु आहे. स्वत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना पूर्णपणे फ्री हॅण्ड दिले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांची धरपकड सुरु आहे. असे असताना आता नाशिक पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न कुणीतरी केला आहे.
एका व्यक्तीकडून भाजप पदाधिकाऱ्याला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शरद फडोळ यांना गुरुवारी (ता. ९) रात्री उशिरा फोनवरून ठार करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शरद फडोळ यांनी स्वत:माध्यमांना माहिती दिली. त्यानुसार, फडोळ हे गुरुवारी (दि. ९) रात्री सव्वाअकराच्या सुमारास घरी असताना त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. समोरच्या व्यक्तीने अर्वाच्य भाषेत त्यांना शिवीगाळ केली. तसेच गोळ्या घालून ठार करण्याची धमकी दिली.
गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही अटक करुन पोलिसी खाक्या दाखवण्यात आला आहे. ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असे वाक्य गुन्हेगारांच्या तोंडून वदवून घेण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांची कारवाई राज्यभरात चर्चेचा विषय आहे.
या घटनेनंतर फडोळ यांनी तत्काळ अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची भेट घेत त्यांना सर्व काही सांगितले व तक्रार दिली. हवालदार सोमनाथ गुंड यांच्याकडे तपास असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा फोन कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला याचा तपास केला जात आहे.
शहरात पोलिसांकडून गुन्हेगारांचा थरकाप उडेल अशा धडाकेबाज कारवाया केल्या जात आहेत. नाशिककरांनी देखील पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. असे असताना अशा प्रकारची धमकी आली असल्याने पोलिसांनाच एक प्रकारे आव्हान दिल्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या घटनेचा संबंध कोणत्या राजकीय अथवा गुन्हेगारी गटाशी आहे का? याचा तपास पोलिसांना करावा लागणार असून त्याकडे पोलिसांचे लक्ष आहे.


