SC Cancels Chhota Rajan Bail: 2001 मध्ये मुंबईतील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या खळबळजनक हत्येप्रकरणी माफिया डॉन राजेंद्र एस. निकाळजे उर्फ छोटा राजन याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर सुनावणी करत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा दिलेला जामीन आदेश रद्द केला. सीबीआयने न्यायालयासमोर मांडले की छोटा राजन आधीच 4 गुन्ह्यांत दोषी ठरलेला आहे आणि तो जवळपास 27 वर्षे फरार होता.
हेही वाचा –मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याने शिवसैनिकांमध्ये संताप; आरोपीचा शोध सुरू
विशेष मकोका न्यायालयाने राजनसह इतरांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, राजनने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते आणि त्यावर सुनावणी प्रलंबित असतानाही जामिनाचा आदेश मिळाला होता. तथापी, राजन 2011 मध्ये पवई येथे झालेल्या गुन्हेगारी पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी नवी दिल्लीच्या तिहार मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याने त्याला जामिनाचा लाभ घेता आला नाही.
दरम्यान, जया शेट्टी हे दक्षिण मुंबईतील गोल्डन क्राउन हॉटेलचे मालक होते. त्यांची 4 मे 2001 रोजी दोन बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ही हत्या दाऊद इब्राहिमचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या छोटा राजनच्या आदेशावरून झाल्याचे स्पष्ट झाले होते. प्रदीर्घ खटल्यानंतर, राजनसह इतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. या खुनामुळे मुंबईच्या व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.


